बाजार समिती पुन्हा बंद ठेवणार ?; गेल्या तीन दिवसात १३ कोटींची उलाढाल ठप्प !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बाजार समिती तीन दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या आवारात एक व्यापारी आणि एक हॉटेल व्यावसायिक कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळताच सभापती संपत काळे यांनी बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण यामुळे बाजार समितीची सुमारे १२ ते १३ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव अरुण काळे यांनी दिली.

बाजार समिती बंद असल्या कारणाने भाजीपाल्याची आवक बंद झाली असून शहरात भाजीपाल्याचा तुटवडा भासू लागला आहे. बाजार समितीतील परिसरात पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बाजार समिती पुन्हा बंद ठेवायची की त्यासाठी काही नियम लागू करायचे यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे बाजार आणि समितीच्या सदस्यांसोबत बैठक बोलावली आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय होईल.