मालेगावमध्ये नवीन 11 पॉझिटिव्ह; मालेगाव महापालिकेचे दोन वरिष्ठ अधिकारीही पॉझिटिव्ह?

मालेगाव (प्रतिनिधी): आज (दि. 13 मे 2020) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण 11 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे मालेगाव महानगरपालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मालेगावचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. उच्च अधिकारीच पॉझिटिव्ह आल्याने सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज दुपारी 40 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यात 23 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह तर 11 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तसेच यातील 6 अहवाल फेर चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. या 11 रुग्णांमध्ये पालिका आयुक्त व उपायुक्त तसेच दाभाडी येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. शहरात 600 च्या घरात या विषाणूचे रुग्ण झाले असून यात अनेक डॉक्टर व पोलीस कर्मचा-यांचा देखील समावेश आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगाव शहरात दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीत ना.दादा भुसे व शहरातील सर्व प्रशासन अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सदर अधिकारी स्वतः हजर होते. मात्र यावेळी त्यांना आपण स्वतः करोना बाधित असल्याची माहिती मिळताच ते बैठकीतून ताबडतोब निघून गेले.