मालेगावचे महानगरपालिका आयुक्त आणि सहआयुक्तच कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक(प्रतिनिधी): मालेगावचे महानगरपालिका आयुक्त आणि सहआयुक्तच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज (दि. १३ मे २०२०) मालेगाव दौऱ्यावर होते. यावेळी आढावा बैठक सुरु होती, याचवेळी महापालिका आयुक्त आणि स्वच्छता सहआयुक्त यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले आणि दोन्ही अधिकारी तडक दालनाबाहेर गेले. यावेळी कृषीमंत्री आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आढावा घेण्यासाठी मालेगावला गेले होते. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ही आढावा बैठक सुरु होती. याच दरम्यान आयुक्तांना त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजले. त्यांनी क्षणातच या बैठकीतून काढता पाय घेतला. त्याचप्रमाणे सहआयुक्तही पॉझिटिव्ह आढळल्याचे समजल्याने त्यांनीही बैठक ताबडतोब सोडली. ज्या अधिकाऱ्यांवर कोरोना रोखण्याची जबाबदारी आहे, तेच बाधित झाल्याने चिन्ता वाढली आहे. समजलेल्या माहितीनुसार आयुक्तांना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.