मालेगाव शहरात चार हॉट स्पॉट सील

नाशिक – (प्रतिनिधी) मालेगावमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर प्रादुर्भाव पसरू नये यासाठी जिल्हा व पोलिस प्रशासन सज्ज झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मालेगाव शहरातील गुलाब पार्क, मदिना बाग, मोमीनपुरा, कमालपुरा हे चार हॉट स्पॉट निश्चित करून सील करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी मालेगावमधील कोरोना हॉट स्पॉटला भेट देऊन पहाणी केली.

शहरातील गल्लीबोळांवर ड्रोन कँमेऱ्याद्वारे विनाकारण फिरणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून १५० वाहने जप्त करण्यात आली आहे. सोशल मिडियाद्वारे दोन धर्मात तेढ माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मालेगावमधील पोलिस अधिकारी-कर्मचारी यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी दोन सँनेटायजेशन व्हँन, मास्क, फेस शिल्ड, पीपीई कीट, हँडग्लोज पुरविण्यात आले आहेत.