कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिर्डीतील साई मंदिर अनिश्चित काळासाठी बंद

नाशिक: शिर्डीचं श्री साई बाबांचं मंदिर हे अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीला भाविकांची प्रचंड गर्दी असते. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी कमी करणं गरजेचं आहे. जेणेकरून हा संसर्ग पसरणार नाही. सर्वसामान्य भक्त असतील किंवा शिर्डीतील ग्रामस्थ या सर्वांसाठी हे मंदिर बंद करण्यात आलंय. मंदिरातील सर्व प्रवेशद्वार आता बंद करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी सिक्युरिटी गार्डसही ठेवण्यात आले आहेत.

केवळ मंदिराचे कर्मचारी ज्याचं काम समाधी मंदिराजवळ आहे, त्यांनाच प्रवेशद्वारातून नोंद करून आत सोडलं जातंय. कुठल्याही भाविकाला किंवा ग्रामस्थांना श्री साई बाबांचं दर्शन आत जाऊन घेता येत नाहीये. त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. यापूर्वी १९४१ ला हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं त्याला कारण होतं कोलाराची वाढलेली साथ. ब्रिटीश सरकारनी त्यावेळी पाच दिवसांसाठी हे मंदिर बंद ठेवलं होतं. आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थानाने हा निर्णय घेतला आहे.