नो फेरीवाला झोनमध्ये फळे विक्रीस विरोध केला म्हणून महिलेने घातला गोंधळ; गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): नो फेरीवाला झोन मध्ये हातगाडी लावून फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्या महिलेस अतिक्रमण पथकाने हटकले असता त्या महिलेला त्याचा राग येऊन गडकरी चौक येथील महानगरपालिका आयुक्त निवासस्थानासमोर फळे फेकून रस्त्याला अडथळा निर्माण केला या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संबंधित महिले विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने फेरीवाला झोन जाहीर केले असून गडकरी चौक या परिसरात शासकीय विश्रामगृह असून या ठिकाणी नो फेरीवाला झोन मनपाने जाहीर केलेला आहे.

मात्र त्या ठिकाणी शशिकला नामदेव खरात ही महिला हात गाड्यावर फळ विक्री करीत असताना मनपाच्या अतिक्रमण विभाग पथकाने त्या महिलेस हातगाडा काढून घेण्याच्या सूचना केल्या असता त्या महिलेने त्याचा राग येऊन हात गाड्यावर असणारे काही फळं मनपा आयुक्त मा.राधाकृष्ण गमे याच्या निवासस्थाना समोरील रस्त्यावर टाकुन अडथळा निर्माण केला तसेच पश्‍चिम विभागाचे अतिक्रमण कर्मचारी श्रीराम मधुकर गायधनी यांच्याशी वाद घालून वजन काट्याच्या भांड्याने स्वतःच्या डोक्यावर मारून घेऊन आरडा ओरड करीत अतिक्रमण विभागाच्या गाडी समोर येऊन बसली व सरकारी कामात अडथळा आणला म्हणून या फळविक्रेत्या महिलेवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात भादवि कलम १८६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.