किसान रेल्वे आता शेतमालासाठी लासलगावलाही थांबणार!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल पाठवण्याची संधी चालून आली आहे. देवळाली ते मुझफ्फरपुर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरुवार (दि.१७) पासून लासलगाव येथे थांबा मिळणार आहे. परराज्यात शेतमाल पाठवण्यासाठी किसान रेल्वे ला प्राधान्य द्यावे अशी मागणी शेतकरी वर्ग व व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती.

बाजार समितीलगतच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्ग यांना शेतमाल कमी वेळेत पाठवण्याची ही अतिशय उपयुक्त संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी लासलगाव येथे थांबा मिळवण्यासाठी बाजार समिती कार्यालयातील कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी व रेल्वेचे अधिकारी तसेच खासदार डॉ. भारती पवार यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सदर किसान रेल्वे गाडी साठी थांबा मिळावा म्हणून विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने लासलगाव बाजार समितीच्या हितासाठी देवळाली ते मुझफ्फरपूर या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरुवार (दि.१७) पासून लासलगाव येथे थांबा दिला आहे. लासलगाव येथे गुरुवारी सायंकाळी ७.२२ ला थांबणाऱ्या या पार्सल गाडीत शेतमाल पाठवायचा असेल तर पार्सल किंवा बुकिंग साठी पर्यवेक्षक व्ही.बी.जोशी यांच्याशी ९९२१२९२१९९ / ९५०३०११९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा व शेतमाल पाठवावा असे सभापती जगताप यांनी सांगितले आहे.