FactCheck: ’10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही’??

कोरोनाव्हायरसची (Coronavirus) घरच्या घरी करता येणारी ही सेल्फ टेस्ट (self test) सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

नाशिक, 31 मार्च : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लक्षणं नाही दिसली तरी कोरोनाव्हायरस असू शकतो. अशावेळी तुम्हाला कोरोनाव्हायरस आहे की नाही हे कसं ओळखावं, अशा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यानंतर याबाबत कुठूनतरी माहिती मिळवण्याचा प्रयत्न लोकं करतात. कोरोनाव्हायरसबाबत सोशल मीडियावर (social media) बऱ्याच अफवा आणि चुकीची माहिती, गैरसमज पसरवले जात आहेत. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी लोकं याला बळी पडत आहेत. अशाच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांपैकी एक म्हणजे कोरोनाव्हायरसची घरच्या घरी सेल्फ टेस्ट (coronavirus self tets).

“किमान 10 सेकंद तुमचा श्वास रोखू धरा. जर तुमला हे जमलं तर तुम्हाला कोरोनाव्हायरस नाही.” कोरोनाव्हायरसची घरच्या घरी करता येणारी ही सेल्फ टेस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. कोरोनाव्हायरसच्या या सेल्फ टेस्टमध्ये कितपत तथ्य आहे ? वाचा..

भारत सरकारनेही सोशल मीडियावरील हा दावा खोडून काढला आहे.

पीआयबीवर करण्यात आलेल्या ट्विटनुसार, “कोरोनाव्हायरस असलेले बहुतेक तरुण रुग्ण 10 सेकंदापेक्षाही जास्त वेळ आपला श्वास रोखून धरू शकतात आणि बहुतेक वयस्कर लोकांना हे शक्य नाही”. त्यामुळे ही फेक माहिती आहे

तर जागतिक आरोग्यसंघटनेच्या मते, खोकला न येता किंवा अस्वस्थ न वाटता 10 सेकंद श्वास रोखून धरणं शक्य असणं याचा अर्थ तुम्हाला कोरोनाव्हायरस किंवा फुफ्फुसाचा इतर आजार नाही, असं अजिबात नाही.

जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, “खोकला, ताप, थकवा ही कोरोनाव्हायरसची प्रमुख लक्षणं आहेत. काही लोकांमध्ये या आजाराची तीव्रता गंभीर असते. कोरोनाव्हायरस आहे की नाही याचं निदान करण्यासाठी प्रयोगशाळेत केलेली चाचणीच योग्य आहे. असं श्वास रोखून तुम्हाला कोरोनाव्हायरस आहे की नाही हे समजणार नाही. खरं तर असं करणं धोकादायक आहे”