“ते” पाचही जण अ‍ॅक्सिस बँकेचं एटीएम फोडण्याच्या तयारीतच होते.. पण ऐन वेळी…

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडून चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चोरांना शिताफीने अटक करण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच इंदिरानगर पोलिसांनी केलेली ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल दिनेश रमेश पाटील आणि के.जी.गिधाडे हे आपल्या इंदिरानगर हद्दीमध्ये गस्त घालत असतांना सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चेक करण्यासाठी गेले. त्यावेळी दोन व्यक्ती एटीएममधून काळ्या रंगाची बॅग घेऊन पोलिसांना पाहून पळून जाताना दिसले. ही बाब बीट मार्शल पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ या प्रकारची माहिती शहर पोलीस नियंत्रण कक्षास तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यास दिली. ही माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ वासननगर परिसरात पोहोचले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत संशयित आरोपी यांनी पळ काढला. मात्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संपूर्ण परिसरात शोध घेत असतांना वासननगर उद्यानाजवळ संशयित रुपेश शिवाजी कहार (वय: २१, राहणार कृष्णानगर, ढोकणे मळा, गोपालपार्क, अंबड) याला पकडण्यात आले.

यात त्याचे आणखी चार साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संशयिताने एटीएम फोडून चोरी करणार असल्याचे पोलिसांना कबुल केले. यावेळी संशयिताकडून एटीएम फोडण्याचे साहित्यसुद्धा जप्त करण्यात आले आहे. तसेच या इसमांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.