आयसीएमआरतर्फे नाशिकच्या कोरोना टेस्टींग लॅबला मान्यता

नाशिक (प्रतिनिधी): आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात करोना टेस्टिंग लॅब येत्या आठवड्यात सुरु होणार आहे. या कोरोना टेस्टींग लॅबला इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चने (आयसीएमआर) मान्यता दिली आहे. आयसीएमआरच्या महासंचालकांनी सोमवारी (दि.20) मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांना हे पत्र दिले आहे.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या लॅबसाठी मोठ्या प्रमाणात मदत व परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. ‘आयसीएमआर’च्या महासंचालक तथा ‘एआयआयएमएस’मधील मायक्रोबायोलॉजीच्या प्राध्यापिका डॉ.मीना मिस्त्रा यांनी या लॅबची तपासणी केली. यात येथील कर्मचारी, आवश्यक सामुग्री आदी अत्यावश्यक बाबींची पाहणी केली. अखेर सोमवारी (दि.20) ’आयसीएमआर’ने ही लॅब सुरु करण्यास परवानगी दिली आहे.