HSC Result : नाशिक विभागाचा निकाल 94.35 टक्‍के

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) ऑनलाइन पद्धतीने बुधवारी (ता.८) दुपारी एकला जाहीर झाला आहे.

नाशिक विभागातून नियमित व पुर्नपरीक्षार्थी असे एकूण एक लाख ६४ हजार ०२९ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले होते.

यापैकी एक लाख ५४ हजार ७६४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. विभागाचा निकाल ९४.३५ टक्‍के लागला आहे. विभागात धुळे जिल्‍ह्याचा सर्वाधिक ९६.३७ टक्‍के निकाल लागला असून, नाशिक जिल्‍ह्याचा ९२.६५, जळगाव जिल्‍ह्याचा ९५.४६ आणि नंदुरबार जिल्‍ह्याचा निकाल ९५.६३ टक्‍के लागला आहे.

विद्यार्थ्यांना १७ जूनपासून कनिष्ठ महाविद्यालयांतून गुणपत्रिका (मार्कशिट) वाटप केले जाणार आहेत. निकालाची सविस्‍तर माहिती विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

दुपारी एकला निकाल जाहीर होताच संकेतस्‍थळावर निकाल पाहण्याची लगबग विद्यार्थी व पालकांमध्ये बघायला मिळाली. गेल्‍या ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत इयत्ता बारावीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. गेल्‍यावर्षी कोरोना महामारीमुळे लेखी परीक्षा घेता आलेली नसल्‍याने मुल्यांकनाच्‍या आधारे निकाल जाहीर केला होता. परंतु यंदा मात्र ही परीक्षा घेण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले होते. त्‍यानुसार विद्यार्थी शिकत असलेल्‍या उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र निर्धारीत करण्यात आलेले होते.

गतवर्षीच्‍या तुलनेत निकाल घसरला:
गेल्‍या वर्षी मुल्‍यांकनाच्‍या आधारे निकाल जाहीर केलेला असल्‍याने उत्तीर्णांची टक्‍केवारी वाढलेली होती. मार्च २०२१ ला नाशिक विभागाचा निकाल ९९.६१ टक्‍के होता. त्‍या तुलनेत यावर्षी सुमारे पाच टक्‍यांनी निकालात घसरण झालेली आहे. मात्र मार्च २०२० च्‍या लेखी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८८.८७ टक्‍के तर मार्च २०१९ च्‍या परीक्षेत विभागाचा निकाल ८४.७७ टक्‍के लागला होता. या निकालाशी तुलना केल्‍यास सरासरी सहा टक्‍यांनी निकालात वाढ झालेली आहे.

पुर्नपरीक्षा, श्रेणीसुधारणेसाठी शुक्रवारपासून मुदत:
जुलै-ऑगस्‍ट २०२२ या पुरवणी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पुर्नपरीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्‍यासाठी शुक्रवार (ता.१०) पासून मुदत असेल. गुणपडताळणीसाठी शुक्रवार (ता.१०) पासून २० जूनपर्यंत मुदत असेल. तर उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करुन घेण्यासाठी २९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates