आता होम क़्वारंटाईन व्यक्ती बाहेर कुठे गेल्यास प्रशासनाला लगेच ट्रॅक होणार !

होम क़्वारंटाईन केलेले व्यक्ती इकडे तिकडे फिरत असल्याच्या रोजच्या बातम्या येत आहेत. पण आता नाशिक महानगरपालिकेने यावर चाप बसविण्यासाठी शक्कल लढविली आहे. आता होम क़्वारंटाईन व्यक्ती बाहेर कुठे गेल्यास प्रशासनाला लगेच ट्रॅक होणार आहे.

यासाठी नाशिक महानगरपालिकेने महाकवच app विकसित केले आहे ! या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे, कॉन्टॅक ट्रेसिंग आणि दुसरं – क्वारंटाइन ट्रॅकिंग !

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचं ट्रेसिन्ग. अशी व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचं ट्रेसिंग करणं या पमुळे शक्य होणार आहे. शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचं ट्रेसिंगही महाकवचमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता महाकवचमुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत.
महाकवच प्लॅटफॉर्मचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती यांनी किमान १४ दिवस स्वतःचं विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणं अतिशय आवश्यक आहे. पण,लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच अॅप इनस्टॉल केलं जाईल तेव्हा अशा व्यक्तींचं क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स . अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा अॅपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या अॅपचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो अॅपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल.

महाकवच अॅप हे केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी असून फक्त अशाच व्यक्ती हे अॅप वापरू शकतात. त्यांना ह्या अॅसाठी लिंक व कोड मनपाकडून पाठवण्यात येईल. इतर लोकाना मात्र हे अॅप वापरण्याची परवानगी नसेल.

या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये पुढील संस्थांचा पुढाकार खूप महत्त्वाचा आहे – नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी – भारत सरकार, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी – महाराष्ट्र शासन, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन ,नाशिक स्मार्ट सिटी,डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर (TCS फाऊंडेशनचा उपक्रम), कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन.

सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नासिक प्रशासनात त्याचा वापर सुरू आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. डॉक्टर्स, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी कोरोना विरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात याची फार महत्त्वाची भूमिका असेल हे नक्की.