नाशिकमध्ये अजून एका कोरोनामुक्त रुग्णास मिळाला सोमवारी डिस्चार्ज !

नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे मालेगावमध्ये कोरोनाबाधीतांचे आकडे वाढत असताना नाशिकच्या गोविंदनगर भागातील आढळलेला रुग्ण आता कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला सोमवारी (दि.20) सायंकाळी 5 वाजता जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाने यांच्यासह डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांनी टाळ्या वाजवून रुग्णास निरोप दिला.

महापालिकेच्या आरोग्य पथक व पोलीस पथकाने गोविंदनगरच्या या 44 वर्षीय रुग्णाच्या घरी जावून त्यास उपचारार्थ शनिवारी 4 एप्रिल रोजी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असता 6 एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या रुग्णावर उपचार सुरु केले. औषधोपचारांच्या जोरावर हा रुग्ण पूर्णपणे बरा झाला. या रुग्णाने आरोग्य विभागाचे मनपूर्वक आभार मानले आहेत. आरोग्य विभागाने त्यांची पुरेपूर काळजी घेतली आणि मनोधैर्यही वाढवले असे सांगितले आहे.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..