सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही; जितेंद्र आव्हाडांच्या खात्यावरुन चुकीची माहिती प्रसारित

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चुकीची माहिती प्रसारित होऊ नये म्हणून सर्वजण प्रयत्नशील असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सोशल मीडिया खात्यावरुन मात्र चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. माझं सोशल मीडिया सांभाळणाऱ्यांनी चुकीची माहिती ट्विट केली. ज्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. माध्यमांकडून विचारणा करण्यात आल्यानंतर हा प्रकार माझ्या लक्षात आला. या प्रकाराबद्दल मी माफी मागतो, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

माझं सोशल मीडिया अकाऊंट चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात आलं, हा प्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना सात दिवसांची सुट्टी दिल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्या खात्यावरुन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सांगत कमी मनुष्यबळात काम करता येईल का? यावर विचार सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे.