खुशखबर: गॅस सिलिंडरच्या किमती आजपासून कमी झाल्या !

देशातल्या वाढत्या महागाईने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. अशातच सुखद बातमी आली आहे आणि ती म्हणजे सिलिंडरच्या किमती घसरल्याची !

गेल्या महिन्यात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामन्यांना या दरवाढीचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात घट झाली आहे. तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात मोठी घट केली आहे. आजपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडर ५३ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

तर नाशिक शहरामध्ये एका गॅस सिलींडरचा दर रुपये 851.50 असा होता तो आता 798 रुपये इतका झाला आहे, अशी माहिती पाडेकर गॅस सर्व्हिसेसचे संचालक रमेश पाडेकर यांनी “महाराष्ट्र एक्स्प्रेस ग्रुप”शी बोलताना दिली आहे.

सिलिंडरच्या दर वाढीत गेल्या महिन्यात १५० रुपयांची वाढ केली होती. मुंबईत ८२९.५० रुपये, दिल्लीत ८५८.५० रुपये, कोलकाता मध्ये ८९६.०० रुपये आणि चेन्नईत ८८१.०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मात्र आजपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. आता मुंबईत ७७६,५० रुपये आहेत. तर दिल्लीत ८०५.५० रुपये, कोलकातामध्ये ८३९.५० रुपये आणि चेन्नईत ८२६ रुपये आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, गॅस सिलिंडरच्या दरामध्ये ऑगस्ट २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत तब्बल सहा वेळा वाढ झाली होती. गॅस सिलिंडरचे दर १ जानेवारी रोजी बजेट मांडण्यापूर्वी भडकले होते. २२४.९८ रुपयांची वाढ कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये झाली होती. मात्र आजपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.