म्युकरमायकोसिसवर जन आरोग्य योजनेअंतर्गत या आठ रुग्णांलयात होणार मोफत उपचार !

नाशिक (प्रतिनिधी): महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत असून, नाशिकमधील आठ रुग्णालयांत या आजरावर उपचार मोफत करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात जिल्हाधिकारी मांढरे म्हणतात, दिलासादायक म्हणजे म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचारासाठी लागणारी ‘अँटी फंगल’ आणि ‘एम्फोटेरीसिन बी’ ही औष’धे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नाशिक यांचेमार्फत रुग्णालयांना मोफत पुरविण्यात येत आहेत. महत्वाचे म्हणजे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना योजनेत समाविष्ट रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होऊन उपचार घेणे आवश्यक आहे.

तसेच सदर योजना ही कॅशलेस पद्धतीने राबविली जात असून योजनेचा लाभ घेण्याकरिता रुग्णालयात रुग्णांस भरती करतेवेळी कोणतेही रेशन कार्ड व आधारकार्ड या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे व ती कागदपत्र रुग्णालयातील ‘आरोग्य मित्र’ यांचेकडे सादर करावीत.

कागदपत्र उपलब्ध नसल्यास कागदपत्रे रूग्णालयात दाखल होताना उपलब्ध नसल्यास रुग्णालयास तशी कल्पना व लेखी स्वरूपात कागदपत्रांची पूर्तता करण्याची हमी देऊन योजनेचा लाभ मिळविता येऊ शकतो. परंतु सदरील कागदपत्रे विहित कालावधीत जमा करणे आवश्यक असेल.योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील “आरोग्यमित्र” अथवा खाली दिलेल्या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. मात्र या योजनेअंतर्गत कोरोना उपचाराच्या अनुषंगाने लागणाऱ्या महागड्या औ’षधांचा समावेश करण्यात आलेला नाही, याची रुग्ण आणि नातेवाईकांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी नमूद केले आहे.

ही आहेत ती आठ रूग्णालये:
मोफत उपचार देणाऱ्या या आठ रुग्णालयांमध्ये जिल्हा शासकिय रुग्णालय नाशिक, एस.एम.बी.टी वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय घोटी, डॉ. वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय, नाशिक, सामान्य रुग्णालय, मालेगाव, नामको चारिटेबल हॉस्पिटल, नाशिक, व्होकार्ट हॉस्पिटल,नाशिक, सह्याद्री हॉस्पिटल, नाशिक, सिक्स सिग्मा हॉस्पिटल, नाशिक या रुग्णालयांचा समावेश आहे.

या सर्व रुग्णांलयांची यादी nashikmitra.in  व nashik.gov.in  या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

योजनेचा लाभ नाकारल्यास येथे संपर्क साधा:
योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी अथवा रुग्णालयाने योजनेचा लाभ नाकारल्यास रुग्णालयातील “आरोग्यमित्र”अथवा एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए संस्थेचे जिल्हा कार्यालय प्रतिनिधी डॉ.राहुल सोनवणे ८०९७५३८१५१, डॉ.समकीत साकला ८०९७५३८१५० यांचेशी संपर्क करावा. तसेच हे कामकाज पाहण्यासाठी घटना व्यवस्थापक म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) निलेश श्रींगी यांची नेमणूक करण्यात आली असून जिल्हा समन्वयक म्हणून डॉ.पंकज दाभाडे  काम पाहणार आहेत. तसेच अन्य मदतीसाठी अथवा तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक  १५५३८८ किंवा १८००२३३२२०० यावर संपर्क साधवा, असेही आवाहन  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790