आधी बाबा घरी येताना खाऊ आणायचे… आणि आता ?

आधी बाबा घरी येताना खाऊ आणायचे….आणि आता ?

नंदिनी मोरे, नाशिक
कोरोना ची परिस्थिती सांभाळणे आता सर्वच देशांच्या हाताबाहेर चालले आहे. पुढे आपल्या ताटात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना कोणालाही नाही…या विषाणूचा संसर्ग टाळता आला पाहिजे म्हणून मार्च महिन्यापासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला बघता बघता मे महिन्यातील लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. पण देशासोबत शहराची स्थिती ही अधिकाधिक गंभीर होत चालली आहे.

या लॉकडाऊनच्या काळा मध्ये कितीतरी उलथापालथ झाली, कित्येक कामगार बेरोजगार झाले, कित्येक रुग्ण दगावले, सोबत आरोग्य कर्मचारी आणि प्रशासनाच्या जीवावर बेतला हा कोरोना. देशातील पत्येक व्यक्ती यात भरडला गेला. देशाची आर्थिक स्थिती खालावली.. कोरोनानंतरचे जीवन कसे असेल, या प्रश्नाने प्रत्येक व्यक्ती आज चिंतीत आहे. या कोरोनाच्या सावटाने सर्वांना हादरवून ठेवले आहे.

अशातच लॉकडाऊन शिथीलतेचे निर्णय सरकारने घेतले…हे म्हणजे “दुष्काळात तेरावा महिना’’ असल्या सारखे झाले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने आवश्यक सेवेसोबतच इतर सोयी सुविधा सुद्धा चालू करण्यात आले. आणि आता लोकं काही ना काही निमित्ताने घरा बाहेर पडू लागले आहे… त्यात त्यांच्यावर लक्ष द्यायला आणि नियम पाळायला भाग पडणारी यंत्रणा नाही. अशा वेळेस कोण पाळणार सोशल डीसटन्स..कोण घेईल स्वतःची काळजी…

पण आजची कोरोनाची परीस्थिती बघता घरातून बाहेर जाणारी व्यक्ती हि परतताना निरोगी परतेल की नाही हा प्रश्नच आहे. अशा वेळेस आपण जेव्हा विनाकारण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्या कुटुंबीयांचा विचार का कोणी  करत नाहीत…कोरोना पूर्व काळात घरातील लहान मुलांना बाबा घरी यायचे तेव्हा अतिशय आनंद व्हायचा, बाबा आल्या आल्या मिठीत घेऊन आपल्याला खाऊ देणार हे त्यांना माहित असायचे, आणि आताही त्यांची तीच अपेक्षा आहे, कारण त्यांना कोरोना माहित नाही पण बाबा नेहमी प्रमाणे बाहेरून येतील आणि आपल्याला खाऊ देतील हे माहित आहे.

परंतु आज घरी गेल्यावर आपल्या मुलांना मिठीत घेण्याचा तो हक्क कुठे न कुठे संपुष्टात आलाय..तो का? याचा विचार आपण केव्हा करणार? परिस्थिती डोळ्यासमोर असताना सुद्धा, “कळतय पण वळत नाही’’ अशी आपली स्थिती का? कोरोना एखादा ट्रेंड असल्या प्रमाणे फक्त समाज माध्यमांद्वारे आपण जनजागृतीचा पोस्ट टाकतोय, पण प्रत्यक्षात आपली कृती हि शून्य आहे. मग कोरोना सारख्या गंभीर बाबतीत कुठे जातो आपला सुशिक्षित पणा?