FASTag बाबत सरकारचा मोठा निर्णय; वेळ मर्यादा वाढवली !

याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) कॅश कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता यासाठीची वेळ मर्यादा वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्व वाहनांसाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य (FASTag mandatory) केला आहे. परंतु आता सरकारने यात वाहन चालकांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने फास्टॅगची शेवटची तारीख वाढून 15 फेब्रुवारी केली आहे. जर तुमच्या गाडीला अजूनही फास्टॅग लावला नसेल, तर आणखी दिड महिन्यांचा कालावधी आहे.

याआधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) कॅश कलेक्शन बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता यासाठीची वेळ मर्यादा वाढवण्यात आली आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर गाड्यांच्या लांबच लांब रांगांपासून सुटका होण्यासाठी फास्टॅग सिस्टम आवश्यक आहे.

फास्टॅग ई-कॉमर्स साईट अ‍ॅमेझॉवर, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि पेटीएमवरुन खरेदी करता येतो. त्याशिवाय कोणतीही बँक, पेट्रोल पंप किंला टोल प्लाझावरही फास्टॅग खरेदी करता येतो. बँकेतून फास्टॅग खरेदी केल्यास, ज्या बँकेत खातं आहे, त्याच बँकेतून फास्टॅग खरेदी करणं आवश्यक आहे. फास्टॅग 200 रुपयांत खरेदी करून कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करावा लागतो.

तसंच, FASTag जेथे खरेदी केला आहे, तिथेच तो रिचार्ज करा. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. जर ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील.