BREAKING: गोळे कॉलनीत लाखो रुपयांचा बनावट सॅनिटायझर साठा जप्त

नाशिक: कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी वेळोवेळी सॅनिटायझर वापरावे अशी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्याचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणारेही कमी नाहीत. नाशिक शहरातील मोठी उलाढाल असलेल्या गोळे कॉलनीत बनावट सॅनिटायझर आढळून आले आहे, या ठिकाणी भरारी पथकाने छापा मारून लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे.

भरारी पथकाने केलेल्या कारवाईत आज दोन ठोक व्यापाऱ्यांकडून जवळपास १ लाख ६ हजार रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे.   संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. बनावट सॅनिटायझर विक्रीवर कारवाई केल्यामुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे आणि संतापही व्यक्त होत आहे. सॅनिटायझर चढ्या किंमतीत विक्री होत आहेत, तर अनेकठिकाणी कालबाह्य सॅनिटायझरवर प्रिंटेड असलेले स्टीकर चिटकवून सर्रास कालबाह्य विक्री केल्याचे उघडीस येत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक व सह आयुक्त (औषधे)(नाशिक विभाग) व सह नियंत्रक, वैदयमाप शास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथक नेमण्यात आले असून पथकात औषध निरीक्षक, वैदयकीय अधिकारी नाशिक मनपा, निरीक्षक- वैधन मापन विभाग यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी असून संबंधित विक्रेत्यांवर ते कारवाई करत आहेत. या पथकाकडून आज नाशिक येथे ठोक विक्रेत्यांच्या व किरकोळ विक्रेत्याच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीत  राहल एन्टरप्राईजेस, आशापुरी एजन्सी, या दोन ठोक विक्रेत्यांकडे बनावट सॅनिटायझर असल्याचे तपासणीत आढळून आले.

याद्वारे औषध निरीक्षक स.सा. देशमुख यांनी एकूण रु. 1 लाख 06 हजार 210चा सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे.  प्रतिबधित करण्यात आलेला साठा हा प्रथमदर्शनी विनापरवाना उत्पादित केला असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत अधिक चौकशी सुरु आहे व संबंधिताविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.