नाशिकमध्ये कुठलीही फवारणी होणार नाही; व्हॉट्सअपवरचा तो मेसेज खोटा

नाशिकमधल्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आज सकाळपासून एक मेसेज फिरतोय..आणि तो ही नाशिक महानगरपालिका आयुक्तांच्या नावानी.. हा मेसेज खोटा असून याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे…

काय मेसेज फिरतोय..

नाशिक शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर नाशिक मनपा आयुक्तांचा संदेश :
“नमस्कार, मी तुम्हाला विनंती करतो की आज रात्री 10 वाजल्या नंतर व उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत आपले घर सोडू नका. कोविड-१९ kill मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होणार आहे !! आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटूंबाला ही माहिती सामायिक करा …धन्यवाद!”

हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे तसेच खोडसाळपणाचा आहे.. हा मेसेज पसरायला सुरुवात झाल्यानंतर तो चक्क नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे यांना सुद्धा आला.. असा कुठलाही मेसेज महानगरपालिका आयुक्तांनी दिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी ताबडतोब याबाबत सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आणि गुन्हा दाखल केला.. हा गुन्हा पुढील तपास कामी सरकारवाडा पोलिस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे.. सध्या कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती नाजूक आहे. अशातच अनेक मेसेज सोशल मिडीयावर फिरत आहेत.. अशा वेळी नागरिकांनी संयम राखावा आणि कुठलाही मेसेज फोरवर्ड करू नये, अन्यथा अफवा पसरविल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात येईल असे, सहायक पोलीस आयुक्त अमोल तांबे यांनी सांगितले आहे.

खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरस चा संसर्ग रोखण्यासाठी जितके प्रयत्न जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग करत आहे, तितकेच प्रयत्न पोलीस प्रशासनही करत आहेत. नाशिकमध्ये बंदी असताना सुद्धा अनेक मंगल कार्यालयांमध्ये लग्नाचे आणि इतर कार्यक्रमही पार पडले, ज्यात पन्नासहून अधिक लोकं होते, त्या मंगल कार्यालयांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. त्यामुळे, जर प्रशासन इतके सतर्क असेल तर थोडी तरी जबाबदारी नागरिकांचीही आहे.. सोशल मिडियावरील अफवा हा सुद्धा एक संसर्गच आहे, जो लगेच पसरतोय.. आणि ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, की अफवेचा संसर्ग पसरला नाही पाहिजे…!