लखमापूर येथील एव्हरेस्ट कंपनीला कोविड रूग्णालयांचे साहित्य निर्मितीची विशेष परवानगी

नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे रुग्णालयाची अपुरी संख्या यामुळे शासनाकडून शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. भविष्यात परिस्थिती आणखी बिकट झाल्यास वेगळे पर्याय शोधावे लागणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकार आणि राज्य शासनाने बांधकाम साहित्य निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या एव्हरेस्ट समुहाच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील प्लँटला तात्पुरती कोविड रुग्णालये उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्य निमिर्तीची विशेष परवानगी दिली आहे.

कोरोनाशी लढा देण्यासाठी रुग्णालयांसह सध्या शाळा, महाविद्यालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. मात्र भविष्यात शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यावर ही कोविड सेंटर इतरत्र हलवावी लागतील. त्यामुळे भविष्यातील उपाययोजनांचा विचार करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाने या कंपनीला शासनाची विशेष परवानगी दिली आहे. राज्यासह देशभरात ‘नॉन-एस्बेस्टॉस रुफिंग शीट आणि फायबर सिमेंट’ यांचा वापर करून तात्पुरती कोविड रुग्णालये उभारली जात आहेत. यासाठी लागणारे ‘नॉन-एस्बेस्टॉस रुफिंग शीट आणि फायबर सिमेंट’ निर्मिती नाशिकमध्ये सुरू झाली आहे. एव्हरेस्ट समुहाच्या लखमापूर येथील प्लँटमध्ये या साहित्याची निर्मिती होत असून, देशभरातील विविध राज्यात त्याचा पुरवठा सुरू आहे. रुग्ण विलगीकरण करण्यासाठी जलद खोल्या, कक्ष आदी साहित्याची निर्मिती येथे वेगाने सुरू आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन

लखमापूर औद्योगिक वसाहतीतील ‘एव्हरेस्ट इंडस्ट्रीज फायबर सिमेंट बोर्ड आणि रॅपिकॉन पॅनेल्स’ या प्लँटकडून कोरोना प्रतिबंधक आणि पर्यावरणास अनुकूल असे बांधकाम साहित्य निर्माण करण्यात येत आहे. हे करीत असताना केवळ 50 टक्के कर्मचारी कार्यरत आहेत, प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशनची सुविधा, कर्मचाऱ्यांमध्ये विशिष्ट अंतर आदी नियमांचे येथे पालन केले जात आहे.

आदिवासी बांधवांना रोजगार

या कारखान्यामध्ये 460 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातही बहुतांश कर्मचारी आदिवासीबहुल पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आहेत. लॉकडॉउनमध्येही या कामगारांच्या हाताला काम मिळाले असल्याने ते उत्साहाने काम करीत आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परवानगी

एव्हरेस्ट कंपनीचे काम अत्यावश्यक बाबींशी निगडीत असल्याने त्यांना लॉकडाऊन काळातही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तत्काळ विशेष परवानगी देवून त्यांचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे आपत्ती काळातही तेथील लोकांना रोजगार मिळाला आहे. तसेच कोरोनाच्या संकटात या कंपनीपासून तयार होणाऱ्या उत्पादनाचा या देशालाही फायदा होणार आहे.