नाशिक: कोरोनाबाबत सोशल मिडीयावर अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार !

इतर देशांपाठोपाठ भारतातही कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच नाशिक शहरातील प्रशासनही कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज झाले आहे. संशयितांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अशातच या कोरोनाबाबत सोशल मिडीयावर काही समाजकंटक अफवा पसरवत आहेत. आता अशांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिला आहे.

नाशिकला गेल्या काही दिवसांपासून परदेशातून आलेले अनेक संशयित रुग्ण आढळले. आतापर्यंत ३७ संशयित रुग्णांची तपासणी आरोग्य यंत्रणेने केली आहे. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्हही आले तर काहींचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र तरीही प्रशासन काळजी घेत आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. सध्या परदेशवारी करून नाशिकमध्ये आलेले एकूण नऊ रुग्ण कोरोन कक्षात देखरेखीखाली आहेत.