महानगरपालिका आयुक्तांनी या कारणामुळे दिली खासगी रुग्णालयांना तंबी !

नाशिक (प्रतिनिधी): सवलतीच्या दरामध्ये उपचार करणारे बेड शिल्लक नसल्याचे सांगून रुग्णांची होत असलेली लूट टाळण्यासाठी पालिकेने आता खासगी रुग्णालयांनी आरक्षित ८० टक्के बेड व स्वत:कडील २० टक्के बेडवरील रुग्णसंख्येबाबत दर तासाला रुग्णालयांबाहेर फलक लावून अपडेट करण्याची तंबी दिली आहे. ८० टक्के बेडवरील उपचारासाठीचे दरदेखील रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात लावण्याचे आदेश काढल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

राज्य शासनाने खासगी रुग्णालयांमधील बेडचे वर्गीकरण कायम ठेवले आहे. यात ८० टक्के बेडवरील रुग्णांवर सरकारी दराने बिल आकारले जात आहे. मात्र रुग्णालयांकडून ८० टक्के राखीव बेडबाबत रुग्णांना माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी बेडची संख्या, एकूण रुग्णसंख्या आणि सरकारी दरफलक रुग्णालयाबाहेर लावण्याचे बंधनकारक केले होते.

महापालिकेच्या दर नियंत्रण समितीने खासगी रुग्णालयाबाबत अशा तक्रारी आल्यास कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. ही माहिती दर तासाला रुग्णालयाबाहेर लावण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर, एपिडेमिक ॲक्ट १८९७, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट २००५,राज्य अत्यावश्यक सेवा कायदा २०११,राज्य नर्सिंग होम ॲक्ट २००६ आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अंतर्गत कारवाईचा इशारा मुख्य लेखापरीक्षक बोधिकिरण सोनकांबळे यांनी दिला आहे.

काय आहेत दर?
खासगी रुग्णालयांना बेडसाठी ४००० रुपये, अतिदक्षता विभागातील बेडसाठी ७५०० तर व्हेंटिलेटर बेडसाठी ९००० दर निश्चित करण्यात आला. त्याचबरोबर विविध आजार व शस्त्रक्रिया यासाठीचे दरही निश्चित करण्यात आले आहे !