धनगर समाज कृती समितीची आरक्षणासाठी मागणी

नाशिक(प्रतिनिधी): धनगड आणि धनगर दोन्ही एकच आहेत.असा अध्यादेश काढून धनगर समाजालाही आदिवासींच्या सर्व सवलती लागू कराव्यात अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

यादरम्यान धनगर समाजाला देखील एसटी संवर्गात मोडून आरक्षण लागू करावे.तसेच मागच्या (फडणवीस) सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा देण्यात याव्यात.अशा मागण्या धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार( दि.२५) रोजी करण्यात आले आहे. तरी शासनाला जाग येण्यासाठी ढोल बजाव आंदोलन आम्ही करत आहोत असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.या आंदोलनामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये धनगर समाजाला एसटीचे दाखले देण्यात यावेत,मागील (फडणवीस) सरकारने दिलेल्या सर्व सवलती कायम करण्यात याव्यात, धनगर समाजासाठी एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात यावी, मेंढपाळ कुटुंबीयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, ग्रामीण भागातील धनगर समाजातील कुटुंबियांना घरकुले मिळावीत, सारथी संस्थेप्रमाणेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्था स्थापन करण्यात यावी‌त, तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्यात यावीत.इत्यादी मागण्यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे जर राज्य सरकारकडून योग्य ती भूमिका घेतली न गेल्यास यापुढे समाजाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील केले जाईल.असा इशाराही निवेदनामार्फत देण्यात आला.