बाजार समितीचे सभापती पिंगळे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तो युवक गजाआड!

नाशिक( प्रतिनिधी) : माजी खासदार आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली होती. याप्रकरणी सभापती देविदास पिंगळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान त्या धमकी देणाऱ्या अल्पवयीन युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तो अल्पवयीन युवक देवळाली गावातला असल्याचे समजते.

देविदास पिंगळे यांची नुकत्याच काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती म्हणून निवड झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे बाजार समितीच्या जागेत भूमिपूजन होणार असल्याने पिंगळे मंगळवारी (दि.१५) संचालक मंडळासोबत तयारी व पाहणी दौरा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर संचालक मंडळातील एका संचालकाच्या शेतावरून रात्री साडेनऊच्या दरम्यान धोंडेगाव गिरणारे रस्त्याने परत येत असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमाने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पिंगळे यांनी तालुका पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीकडून माझ्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो अशी तक्रार दाखल केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणात तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांच्या सायबर शाखेने त्या क्रमांकाचा शोध घेऊन धमकी देणाऱ्या युवकास ताब्यात घेतले आहे.