महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातलं पहाटेचं दर्शन बंद

नाशिक : महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर गर्भगृहातलं पहाटेचं दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

trimbakeshwar
संग्रहित फोटो

जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वराच्या या मंदिराच्या गर्भगृहात महादेव, विष्णू आणि ब्रह्मा अशा तिन्ही देवांची प्रतिकं त्रिपिंडीच्या स्वरुपात आहेत. देशातली ही एकमेव अशी महादेवाची पिंडी आहे, ज्यामध्ये शिवलिंग नाही. म्हणूनच महाशिवरात्रीला या पिंडीचं दर्शन घेण्याची भाविकांची चढाओढ लागते.

विशेषतः पहाटे एक ते दोन तासात हजारो भाविक याठिकाणी जमतात. त्यातून चेंगराचेंगरी होण्याची भीती असते. तसंच या छोट्याशा गर्भगृहात भाविक गुदमरु शकतात. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून गर्भगृह दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे.

यंदाच्या महाशिवरात्रीला एक लाखाहून अधिक भाविक त्रंबकेश्वरला भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ महादेव मंदिरातच नव्हे, तर त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा जनसमुदाय लोटणार आहे. नुकताच एका भाविकाचा दर्शन रांगेत मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि देवस्थानने योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे.