मंगळवारच्या वादळामुळे नाशिक शहर व मालेगावात 650 पेक्षा जास्त वीज खांब कोसळले

नाशिक (प्रतिनिधी): मंगळवारी जोरदार पाऊस व चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे जिल्ह्यातील नाशिक शहर व मालेगाव मंडळात जवळपास लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीज खांब कोसळले, यामध्ये ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा  वीजपुरवठा खंडित झाला होता आणि काही भागात सुरक्षेसाठी बंद करावा लागला. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले.

आणि बंद पडलेली बहुतांश विद्युत उपकेंद्र सुरु करीत  कोलमडलेली यंत्रणा दुरुस्त  करून  शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश भाग गुरुवारी पूर्ववत केला आहे. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला.  तसेच अनेक वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद ठेवण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील ७५३ वाहिन्यांचा पूरवठा प्रभावित झाला.

 वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र प्रचंड वाऱ्याच्या  वेगामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र वारा व पावसाचा वेग ओसरताच गुरुवारी दुपारपर्यंत नाशिक शहरातील व जिल्ह्यातील बहुतांश वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले.  मात्र ग्रामीण भागात व दुर्गम ठिकाणी  काही ठिकाणी कार्यात अडथळे असल्याने तात्पुरता पुरवठा सुरू केला असून दुरुस्तीचे  कार्य अजून सुरूच आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह  जनवीर  अधीक्षक अभियंते रमेश सानप आणि  प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, अभियंते आणि जनमित्र सातत्याने कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला असुन उर्वरीत सुद्धा सुरू करणार आहेत.

निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ / १९१२ यावर तसेच  आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा  असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790