कोविडची 19 ची लस नाशिकमध्ये आली ! 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात

नाशिक (प्रतिनिधी): कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. या उपायोजनातील एक महत्वाचा घटक म्हणजे कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली लस आहे.  सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे जिल्ह्यासाठी 43 हजार 440 डोसेस उपलब्ध करून देण्यात आले असून महानगरपालिका व ग्रामीण भागातील एकूण 16 लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे आणि 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे या कंपनीची ‘कोविड शिल्ड’ लसीचे 9 लाख 36 हजार 50 डोसेजेस राज्यासाठी प्राप्त झाले असून त्यापैकी नाशिक  जिल्ह्यासाठी 43 हजार 440 डोसेजेस आज प्राप्त झाले आहेत.  कोविड-19 लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक, सामान्य रुग्णालय मालेगाव, उपजिल्हा रुग्णालय कळवण, उपजिल्हा रुग्णालय निफाड, उपजिल्हा रुग्णालय चांदवड, उपजिल्हा रुग्णालय येवला, ग्रामीण रुग्णालय दिंडोरी, नाशिक तालुक्यातील सय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक,  शहरी आरोग्य केंद्र सातपुर नाशिक, शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र जे. डी. सी बिटको नाशिक, शहरी आरोग्य केंद्र कॅम्प वॉर्ड मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र निमा 1 मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र रमजानपुरा मालेगाव, शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव अशा महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळुन जिल्ह्यात एकूण 16 ठिकाणी लसीकरणासाठी केंद्र निश्चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी . मांढरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

लसीकरण केंद्रांवर आवश्यक तापमान निश्चित करून व्हॅक्सीन व्हॅनच्या सहाय्याने आज प्राप्त झालेल्या लसी वेळेत पोहचविण्यात येणार आहेत. जेणेकरून कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठीचा शेवटचा टप्पा असणारे लसीकरण 16 जानेवारीपासून जिल्ह्यातील 16 केंद्रावर नियोजित केल्यानुसार सुरू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी . मांढरे यांनी सांगितले आहे. 

निवड करण्यात आलेल्या संस्थासाठी एक नोडल अधिकारी व प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून या टिमने लसीकरण दरम्यान मास्क व ग्लोजचा वापर करणे अनिवार्य आहे. कोविड 19 लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या वेटींग रूममध्ये लाभार्थ्यांला 6 फुटांचे सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेण्यात येवून सॅनिटाइज केले जाईल. यानंतर दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये लाभार्थ्याची ओळखपत्रानुसार CoWin aap या ॲप्लिकेशनमध्ये नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला 30 मिनिट परिक्षणासाठी बसविण्यात येणार आहे. या तिन्ही रूममध्ये कोविड 19 महामारीच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपायोजनांच्या माहितीचे फलक प्रदर्शित करण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी . मांढरे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या फेरीत एकूण 18 हजार 135 शासकीय व 12 हजार 480 खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 29 लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत  लस साठविण्यासाठी 210 आयएलआर उपलब्ध आहेत, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

आज पर्यंत अनेकविध प्रतिबंधात्मक उपायांच्या वापर करून आपण या आजाराची व्याप्ती जिल्ह्याच्या केवळ एक ते दीड टक्के लोकसंख्या इतकीच मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आता लसीकरण झाल्यामुळे आपल्याला एक जास्त सक्षम सुरक्षा कवच मिळणार आहे व हे सुरक्षा कवच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने तयार असल्याचेही  मांढरे यांनी सांगितले.