नगरसेवकाच्या भावासह कुटूंबात तिघे पॉझिटीव्ह

नाशिक (विशेष प्रतिनिधी): शहरातील मनपा नगरसेवकाचा भाऊ करोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर सोमवारी रात्री भावाची पत्नी तसेच मुलाचाही तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या कुटूंबातील लहान मुलाचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान या कुटुंबाला वडाळा गावातूनच संक्रमण झाल्याचा संशय आहे. तसेच आजही तीन नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने वडाळा गावात येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले आहे.

करोना हॉटस्पॉट समजल्या जाणाऱ्या वडाळा गावातील मेहबूबनगर परिसरात वर्कशॉप असलेल्या नगरसेवकाच्या भावास सोमवारी कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर सोमवारी रात्री हाती आलेल्या अहवालात या युवकाची पत्नी (वय २९) व मुलगा (वय १५) यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तिघांवरही उपचार सुरु आहेत. 

दरम्यान सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दाटवस्ती असलेल्या गावठाणातील अर्थात जुन्या नाशिकमधील बागवानपुरा १२ वर्षीय बालिका तर  काजीपूरा येथे १६ वर्षाचा मुलगा बाधित असल्याचे आढळून आले. ओमकार नगर (पेठरोड), पंडीत पार्क (कृषी नगर), पाटील पार्क (अंबड लिंक रोड) येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. 
वडाळा गावाकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत.