रंगाच्या फुग्यांचा वापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार – नाशिक पोलीस

नाशिक: संपूर्ण महाराष्ट्रात धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळले जात असले तरी नाशिकला रंगपंचमी खेळण्याची परंपरा आहे. या आनंदाच्या दिवशी अनेक जण रंगाचे फुगे वापरतात. म्हणजेच फुग्यांमध्ये पाणी किंवा रंग आणि इतर काही गोष्टी टाकून लोकांना मारून फेकतात. आता असं केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो..

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये किती प्रमाणात रंगपंचमी खेळली जाईल हा प्रश्नच आहे. तरीही, खबरदारीचा म्हणून नाशिक पोलिसांनी नागरिकांना रंगाचे फुगे न वापरण्याचं आवाहन केलंय. आतापर्यंत अनेकवेळा अशा प्रकारे फुगे मारून फेकल्याने लोकांना इजा झाल्याचे प्रकार घडले आहेत. यातही काही समाजकंटकांना आसुरी आनंद मिळतो. मात्र आता यावर नाशिक पोलीस लगाम घालणार आहेत आणि त्यांचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे !

नाशिक पोलीस उपआयुक्त विजय खरात (परिमंडळ २) यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. त्यांनी म्हंटले आहे की, अशा प्रकारचे रंगाचे फुगे रस्त्यावरून जाणार्या दुचाकी, चारचाकी किंवा लोकांना मारल्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचे प्रकारही घडू शकतात त्यामुळे, लोकांनी अशा प्रकारच्या फुग्यांचा वापर करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.