इंदिरानगरला वृद्धेची सोनसाखळी हिसकावली

नाशिक : कलानगर चौकातून सराफनगरकडे पायी आपल्या पतीसोबत जात असलेल्या एका ६०वर्षीय वृध्देच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने हिसकावून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शोभा रमेश घुले (रा.सराफनगर लेन-१) या मंगळवारी (दि.१८) कलानगरकडून पायी सराफनगरकडे पतीसोबत जात होत्या. यावेळी सिंग महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमाकं २च्या समोर विरूध्द दिशेने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मंगळसुत्र खेचले. यानंतर घुले दाम्पत्याने आरडाओरड केली असता नागरिक जमले, मात्र तोपर्यंत चोरटा दुचाकीवरून सुसाट फरार झालेला होता. घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच त्वरित पोलीस घटनास्थळी पोहचले मात्र त्यांच्याही हाती उशिरापर्यंत चोरटा लागलेला नव्हता. पोलिसांनी घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५हजार रूपये किंमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक जगदाळे हे करीत आहेत.