घराच्या खिडकीतून हात टाकून चोरटयांनी टेबलावरील गाडीची चावी घेत गाडी चोरली

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील वडनेर दुमाला परिसरात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या घरी रात्रीची वेळ साधत चोरटयांनी घराची खिडकी तोडली. दरम्यान, खिडकीतून हात टाकून टेबलावर ठेवलेल्या लेडीज पर्समधून पैसे काढले. तसेच टेबलावरील चारचाकीची चावी देखील घेऊन पार्क केलेली गाडी चोरून नेली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीपसिंग महेंद्रसिंग ढीललोन (वय ४५) हे घर क्रमांक ६६६ वडनेर दुमाला या परिसरात राहतात. मात्र, फिर्यादी कामानिमित्त परदेशात गेले असता घरात त्यांची पत्नी, आई व मुलगी हे होते. दरम्यान, (दि.३ जानेवारी) रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी फिर्यादी यांच्या घराची खिडकी तोडून खिडकीतून हात टाकून टेबलावर ठेवलेल्या फिर्यादी यांच्या आईच्या पर्समधून ७ हजार २०० रुपये काढले.

तसेच टेबलावर असलेली चारचाकी वाहनांची चावी देखील काढून घेतली. त्यानंतर, फिर्यादी यांच्या घराजवळ पार्क केलेली १ लाख २० हजार किमतीची राखाडी रंगाची इंडिका व्हिस्टा संशयितांनी चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.