कार मध्ये बियरच्या बाटल्या घेऊन जात होते,पोलिसांनी गंगापूर रोडला अडवले आणि मग..

नाशिक(प्रतिनिधी): रविवार (दि. 26 एप्रिल) सायंकाळची वेळ.. लॉकडाऊन असल्याने जागोजागी पोलीस.. अशाच वेळेस गंगापूर रोडवर पोलिसांनी एका कारला अडवलं आणि मग चौकशी केली. तर कारचालकाने पोलिसांना महाराष्ट्र शासनाचं कालबाह्य ओळखपत्र दाखवलं.. पोलिसांना शंका आली आणि त्यांनी कारची डिक्की उघडायला सांगितली.. डिक्की तपासात असतानाच कारचालकाने कार सुरु केली आणि बेरिकेट्स उडवून धूम ठोकली.. आणि मग सुरु झाला थरार !

ही बाब गंगापूर पोलिसांनी नियंत्रण कक्षास सांगितली. नियंत्रण कक्षाचा संदेश मिळताच कारचालकास पकडण्यासाठी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस सतर्क झाले. सुमारे 19 पोलीस वाहनांनी कारचालकाचा पाठलाग केला. अखेरीस अंबड पोलिसांनी त्याला बडदेनगर येथे ताब्यात घेतले. कारचालकाने गंगापूर, सातपूर, सिडको लेखानगर, गोविंदनगर, मुंबईनाका, उड्डाणपूल, शिवाजी चौक येथे भरधाव कार चालवून पोलीसगाडीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले. पोलिसांनी नाकाबंदी करत त्याला अंबड परिसरात ताब्यात घेतले. त्यानंतर कारची डिक्की तपासली असता त्यात बियरच्या बाटल्या आढळून आल्या. गंगापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सागर विलास जाधव वय 24, रा. पांगरे मळा जुने सिडको नाशिक आणि मोतीराम चिंतामण शेवरे वय 20 रा. शिवशक्ती चैक त्रिमुर्ती सिडको नाशिक यांना ताब्यात घेतले आहे.