नाशिक: अडीच किलो सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यास ७५ लाखांना गंडा; आरोपींना अटक !

नाशिक: अडीच किलो सोन्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यास ७५ लाखांना गंडा; आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): अडीच किलो सोने ३० हजार तोळा या भावाने देण्याचे आमिष देत एका आडत व्यापाऱ्याला तब्बल ७५ लाखांना गंडा घालणाऱ्या तिघा संशयितांना पाेलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने काही तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत तिघांना अटक केली. मदन मोतीराम साळुंके (रा. मातोरी), मनीष पाटील (रा. खुटवडनगर), शरद ढोबळे (रा. मधुबन कॉलनी) अशी संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयित मात्र फरार झाला. पथकाने संशयितांकडून ७५ लाखांची रक्कम हस्तगत केली.

पोलिसांनी दिलेली माहिती ईश्वर गुप्ता (रा. आरटीओ कॉर्नर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित मदन साळुंके, मनीष पाटील, शरद ढोबळे यांनी ईश्वर गुप्ता यांना अडीच किलो सोने विक्री करण्याचे आमिष दिले. यातील गुप्ता यांचा सहकारी असलेल्या फरार संशयिताने सोने खरेदी करण्यास सांगत विश्वास संपादन केला. चौघांनी कट रचत अडीच किलो बोगस सोने दाखवत गुप्ता यांचा विश्वास संपादन केला. गुप्ता यांना सोने विक्री करण्यासाठी पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ मार्केट येथील गाळा नंबर २८ येथे गेले. गुप्ता यांना सोने देऊन ७५ लाखांची बॅग घेऊन ते फरार झाले.

सराफ व्यावसायिकाने सोन्याचा दर्जा तपासला असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवत संशयितांचे नावे निष्पन्न केले. शहरातील पंचवटी, खुटवड नगर येथे पथकाने तीघांना रोकडसह अटक केली. वरिष्ठ निरिक्षक आनंद वाघ, रघुनाथ शेगर, महेश कुलकर्णी, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे,संजय मुळक, विशाल देवरे, असिफ तांबोळी, महेश साळुंके, राम बर्डे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.