…म्हणून लहान भावानेच केली मोठ्या भावाची हत्या; पेठरोड येथील घटना

नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून आज लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. मखमलाबाद इथं राहणाऱ्या संतोष थोरे असं या 40 वर्षीय मयत ईसमाचे नाव आहे. थोरे कुटुंबात संतोष हा नेहमी कुटुंबामध्ये दारू पिऊन वाद घालत होता. आईला आणि बहिणीला देखील मारहाण करत होता.

आज (दि.२३) फिर्यादी संदीप अरुण लोखंडे राहणार फुलेनगर पंचवटी, व्यवसाय हमाली ,यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की, ते शरद चंद्र पवार मार्केट मध्ये सकाळी 8 वाजताच्या सुमारास कामावर गेलेले असता, तेथील सुनील सखाराम थोरे वय 37 वर्ष राहणार पूजा विहार रो हाऊस, मखमलाबाद रोड ,पंचवटी यांचा भाऊ संतोष थोरे वय 40 वर्ष हा दारू पिऊन येऊन त्याच्यासोबत विनाकारण वाद घालून शिवीगाळ करत होता. भावाला घरी सोडायचे आहे असे सुनील थोरे याने फिर्यादीला सांगून मोटरसायकलवर मोठा भाऊ संतोषला पाठीमागे घेऊन बसण्यास सांगितले. सुनील थोरे मोटर सायकल चालवतांना मोठा भाऊ पाठीमागून मारू लागला ,शिवीगाळ करू लागला व “मला दारू प्यायला दे” असे म्हणून सुनील सोबत वाद घालू लागला. तेव्हा सुनीलने मोटारसायकल थांबवली. तिघे खाली उतरले. सुनील व संतोष यांच्या मध्ये पुन्हा शिवीगाळ व वाद सुरू झाला एक दुसऱ्याला मारू लागले, यामध्ये संतोष रस्त्याच्या कडेला खाली पडला, सुनील ने रागाच्या भरात तेथे जवळच असलेला दगड उचलून संतोष च्या डोक्यात मारला त्यामध्ये संतोष सखाराम थोरे वय 40 वर्ष मृत्यू झाला. त्यानंतर सुनील मोटरसायकल घेऊन घरी निघून गेला.

फिर्यादी संदीप लोखंडे याने  पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेबाबत सविस्तर फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस स्टेशनला प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी सुनिल सखाराम थोरे यास पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब ताब्यात घेतले आहे.

हा प्रकार सकाळी साडेआठ वाजता घडला असून सदर घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह म्हसरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या हत्येप्रकरणी मयत इसमाचा लहान भाऊ सुनील थोरे यास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले.