अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टर दौऱ्याबाबत खुद्द जिल्हाधिकारीच अनभिज्ञ

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात नुकताच झालेला अक्षय कुमार याचा दौरा चांगलाच वादात सापडला आहे. लॉकडाऊनची परिस्थिती असताना अक्षय कुमारला हेलिकॉप्टर उतरवायची परवानगी कुणी दिली हा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे यावेळी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही याठिकाणी उपस्थिती होती त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजेनरी येथे अक्षय कुमारचा दौरा होता. सध्या सगळे मंत्री हे कारने प्रवास करत असतांना अक्षय कुमारला मात्र हेलिकॉप्टर उतरवायची परवानगी कुणी दिली असा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विचारला आहे. तर याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी म्हंटले आहे. तसेच याबाबत पोलीस प्रशासनाने आपल्याला माहिती देणे अपेक्षित होते असेही ते म्हणाले.

विशेष म्हणजे अंजेनरी नाशिक शहर पोलीस आयुक्तालायाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. असे असताना शहराच्या पोलिसांनी जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत प्रवेश कसा केला? अक्षय कुमारला एक्स्कॉर्ट कसा पुरवला गेला ? आश्चर्य म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अक्षयचं स्वागतही केलं जातं, असे प्रश्न पालकंमत्री छगन भुजबळ यांनासुद्धा पडले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकारी मांढरे यांना चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करावा, असेही भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.