बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर शहरात घेतली जात आहे दक्षता !

नाशिक (प्रतिनिधी) : देशातील हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये बर्ड फ्लूने पक्षी मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे दक्षता म्हणून, जिल्ह्यात संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, दक्षता पथकाची स्थापना देखील करण्यात आली आहे.

कोरोनाने जगात थैमान घातलेले असतांनाच दुसऱ्या बाजूला बर्ड फ्लूच्या आगमनाने मनात धास्ती निर्माण झाली आहे. यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता, पशुवैद्यकीय अधिकऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, जिल्ह्यातील जलाशयांवर स्थलांतरित होणाऱ्या पक्षी व पाळीव पक्ष्यांवर लक्ष केंद्रित करावे. तसेच जिल्ह्यातील ज्या जलाशयाच्या ठिकाणी स्थलांतरित पक्षी येतात, अशा ठिकाणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यानी रोज पशुसंवर्धन विभागामार्फत गावांमध्ये सर्वे करण्याच्या  सूचना केल्या आहेत. तसेच, यावर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रमानुसार, क्लोएकल व ट्रॅकयल स्वॅब हे सिरम सॅम्पल गोळा करून प्रयोगशाळेत पाठवावेत.

त्याचप्रमाणे आठवडे बाजारात संशयित क्षेत्रातून होणारी पक्ष्यांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे यांनी दिली आहे. तसेच सोडियम कार्बोनेटने कोंबड्या ठेवण्याच्या जागेची, गुरांचा गोठा, पशुपक्ष्यांचा वावर असलेली जागा इत्यादींवर वेळोवेळी फवारणी करण्याचे जाहीर केले आहे. पोल्ट्री फार्म चालकांनी पोल्ट्री फार्ममध्ये स्वछता ठेवावी तसेच पक्ष्यांमध्ये लक्षणे आढळल्यास त्वरित माहिती द्यावी असे आवाहन देखील पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. परंतु, बर्ड फ्लूच्या वृत्तानंतर ब्रॉयलर चिकनच्या व अंड्यांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे.