ज्यादा बिल आकारल्याप्रकरणी नाशिकच्या अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील अशोका मेडीकवर हॉस्पिटल नाशिक यांनी रुग्णांकडून शासन निर्णयातील नमूद दरापेक्षा जादा रक्कम आकारल्या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. कोविड-१९ च्या आजारावर उपचार घेण्यासाठी अशोका मेडीकवर हॉस्पिटल येथे रुग्ण दाखल झाले असता त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर रुग्णांना आकारले. याबाबत रुग्णांकडून महापालिकेस तक्रार प्राप्त झाली होती.

त्यात १) दिलीप संपत आहेर या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २४/०५/२०२० ते दि.७/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख २५ हजार ९१९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास दि.११/०६/२०२०  रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.२/०७/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.त्यानंतर  दि.१७/०७/२०२० रोजी पैसे परत न केल्यास नियमांनुसार कायदेशीर कारवाई करणे बाबत पत्र देण्यात आले होते.

२) सुरेश लखीचंद लुंकड या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. १६/०५/२०२० ते दि.९/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने  १६ हजार ९७९ रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास दि.१७/०७/२०२०  रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.०५/०८/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.

३) सचिन नारायण कोरडे या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २८/०५/२०२० ते दि.१३/०६/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने  ७७ हजार ९२० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास दि.२०/०८/२०२०  रोजी नोटीस देण्यात आली होती.

४) शेख सलीम हाजीसदर मोहंमद या रुग्णाने तक्रार केलेली असून ते दि. २६/०६/२०२० ते दि.२०/०७/२०२० या कालावधीत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्याकडून रुग्णालयाने १ लाख ५९ हजार ६७० रुपये जादा आकारणी केल्याची तक्रार मनपाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार अशोका मेडीकवर रुग्णालयास दि.२८/०८/२०२०  रोजी नोटीस देण्यात आली. तसेच दि.०८/०९/२०२० रोजी पैसे परत करणे बाबत पत्र देण्यात आले होते.

त्यानुसार या हॉस्पिटलच्या व्यवस्थापक यांना नोटीस बजावण्यात आली होती  त्यानंतरही सदरच्या ४ रुग्णांना जादा आकारलेली  एकूण रक्कम ३,८०,४८८/- इतकी परत न केल्याने व्यवस्थापक, अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक यांना अंतिम नोटीस देण्यात आलेली होती. सदर नोटीस अन्वये मुदतीत पूर्तता न केल्याने नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्या मान्यतेने अशोका मेडीकवर हॉस्पिटल यांनी शासन अधिसूचना दि.२१/०५/ २०२० व दि.३१/०८/२०२० अन्वये दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध असल्याने उपरोक्त १ ते ४ रुग्ण  यांची  आकारलेली रक्कम  ३,८०,४८८/- मात्र अंतिम नोटीस नुसार मुदतीत परत करण्यात आलेले नाही. त्या रुग्णालय व्यवस्थापना विरुद्ध साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम -२००५, महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० यातील विविध तरतुदींचा भंग केलेला आहे. भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २ व ३ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५८ मुंबई नर्सिंग होम (सुधारणा) अधिनियम २००६ चे कलम ७ व १७ (२) अशोका रुग्णालयाचे विरुद्ध लेखा परीक्षक,मनपा नाशिक यांनी मुंबई नाका, पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे.