पोलिसांनी अटक केल्याने नाशिकचे सराफ व्यावसायिक बिरारी यांची आत्महत्या

नाशिक : चोरीच्या गुन्ह्यातील सोने चोरट्याकडून घेतल्याच्या संशयावरुन हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी (दि.२५) नाशिकमधील सराफ व्यावसायिकास अटक केली. पोलिसांची नजर चुकवत सराफ व्यावसायिकाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शासकीय विश्रामगृह येथे घडली. एन्काउंटरमध्ये चौघांना मारुन देशभर चर्चेत आलेेल्या स्मार्ट हैदराबाद पोलिसांनी नाशिक पोलिसांना कोणतीही माहिती न देता व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न करता परस्पर कारवाई केल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. विजय बुधा बिरारी (रा. नाशिक) असे मृताचे नाव असून, ते भाजप पदाधिकारी होते.


नाशिकमधील सराईत गुन्हेगार हैदराबादमध्ये जाऊन चोर्‍या करायचा. हैदराबाद पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले सोने नाशिकमधील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांना दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस पथक त्याला नाशिकमध्ये घेऊन आले. बिरारी असलेल्या ठिकाणी गुन्हेगार पोलिसांना घेऊन येताच त्यास आरोपी म्हणून अटक करण्यात आली. त्याला मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत आणण्यात आले. मात्र, याठिकाणी बिरारीने पोलिसांची नजर चुकवून बाल्कनीतून उडी मारत आत्महत्या केली.

दरम्यान सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांची आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप; नातेवाईकांचा सिव्हीलसमोर ठिय्या मांडला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी बिरारी यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या पथकातील पाचजणांना ताब्यात घेतले आहे. विश्रामगृहात बिरारी यांच्याशी कोणती चर्चा झाली, त्यांनी तणावातून आत्महत्या केली की दुसर्‍या कोणत्या कारणाने, याबाबत आता नाशिक पोलीस तपास करत आहेत.