पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर सैन्य दलात असलेल्या जवानाने स्वत:च्या हातावर चाकूने वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री ११.३० वाजेदरम्यान पेठे रोडवरील इंद्रप्रस्थनगरी येथे घडली आहे.. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून. चैताली सुनील बावा (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
चैतालीचा विवाह सुनील बावाशी दोन वर्षांपुर्वी झाला. दोघांना अडीच महिन्यांची मुलगीही आहे. सुनील हा सैन्यदलात नोकरीस आहे. विशेष म्हणजे तो श्रीनगर येथून दहा दिवसंपुर्वी सुटीवर आला होता. बुधवारी रात्री दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले. त्यातूनच सुनीलने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने कल्याण येथील चुलत भाऊ किशोर भारतीस मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी वहिनीबाबत विचारणा केली. त्याने “ती स्वर्गात गेली आहे”, असे सांगितले. संशय आल्याने भारती यांनी सिडकोतील चैतालीच्या वडिलांशी संपर्क साधला. ते घटनास्थळी आले असता त्यांना सुनीलने घराचा दरवाजा बंद केल्याचे दिसले. त्यांनी जोरजोरात आवाज दिल्यानंतर त्याने दरवाजा उघडला. दरवाजातून आत येताच त्यांना चैतालीचा खून झाल्याचे दिसले व त्याने स्वत:च्या हातावर चाकूने वार केल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती दिली. म्हसरुळ पोलिसांने घटनास्थळी येत सुनील बावा यास अटक केली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.