‘त्या’ सराईत गुन्हेगारांची अंबडमध्ये धिंड !

अंबड-लिंक रोडवर 26 जानेवारी रोजी पाणीपुरी विक्रेत्यासह सामाजिक कार्यकर्त्यावर भाईगिरी करीत चाकूने हल्ला करुन फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून नागपूरमध्ये अटक केली. भाईगिरीमुळे त्रस्त झालेल्या अंबडवासियांनी अंबड-लिंक रोडवर रास्तारोको आंदोलनसुद्धा केले होते. याप्रकरणी रविवारी (दि.२३) शहर पोलिसांनी करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने (दोघे रा. अंबड) या दोघांची धिंड काढली.

26 जानेवारी रोजी कडुस्कर व भोजने अंबड लिंक रोडवर पाणीपुरी खाण्यास आले होते. बिल देण्याच्या वादावरुन दोघांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूहल्ला केला होता. बाजीराव दातीर भांडण सोडविण्यास गेले असता दोघांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी संतप्त नागरिकांनी अंबड-लिंक रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांशी संवाद साधत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे व कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना नागपूरमधून अटक केली. अंबड परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, गावगुंडांवर वचक राहण्यासाठी पोलिसांनी रविवारी दोन सराईत गुन्हेगारांची धिंड काढली.