सुवर्णसंधी योजनेत फसवणूक; आडगांवकर प्रा.लि.च्या संचालाकांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): सुवर्णसंधी योजनेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याबाबत आडगावकर सराफ प्रा.लि.चे संचालक महेश राम आडगावकर आणि गोकुळ शाम आडगावकर यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दत्तात्रय जोशी ( वय 57 धंदा नोकरी रा.2. भगवती रो हाऊस निखील पार्कच्या मागे, पवननगर, नाशिक) यांनी आरोपी आडगांवकर सराफ प्रा.ली. संचालक, महेश राम आडगांवकर आणि गोकुळ शाम आडगांवकर (दोन्ही राहणार नाशिक)  यांचे विरुध्द सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

यातील आरोपींनी सुवर्णसंधी व दुरदृष्टी या योजनेमध्ये रक्कम गुंतविल्यास जास्त फायदा मिळेल असे आमिष दाखवुन जोशी यांच्याकडुन त्याचे कडील सुवर्णसंधी योजनेत 1,10,000/-रुपये व इतर ठेविदार लोकांचे 5,88,800/- रुपये व दुरदृष्टी योजनेत 378.09 ग्रॅम सोने गुंतविण्यास भाग पाडले व मुदत संपल्यानंतरही त्यांनी फिर्यादी व ठेविदारांचे पैसे व सोने न देता त्या पैशाचा व सोन्याचा अपहार केला असे म्हंटले आहे. त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात (गुन्हा रजिस्टर नंबर १६९/२०२०) भारतीय दंड विधान कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे तसेच एमपीआयडी कायदा कलम ३ व ४ प्रमाणे ८ जून २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची प्रेस नोट २४ जून रोजी पोलिसांतर्फे जारी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे नाशिक शहरातील सर्वसामान्यांनी अशा प्रकारे आडगावकर सराफ प्रा.लि., यांच्या विविध शाखांमध्ये गुंतवणूक केली असल्यास सहायक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी छायाचित्रे: मंगेश सोनावणे