आडगावकर सराफची ‘सुवर्णसंधी’ भोवली

सुवर्णसंधी योजना व दूरदृष्टी सोने योजनेच्या नावाखाली आडगावकर सराफने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांच्या बदल्यात सोने किंवा मूळ रक्कमही परत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांनी शनिवारी (दि.१५) सकाळी कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ दालनात गर्दी केल्याने गोंधळ निर्माण झाला होता. एकाच वेळी मोठ्या संख्येने गुंतवणूकदार जमल्याने कॅनडा कॉर्नर सिग्नललगत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

adgaonkar saraf nashik fraud

आडगावकर सराफ यांनी सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करता यावे यासाठी सुवर्णसंधी योजना व दूरदृष्टी सोने गुंतवणूक योजना सुरु केली होती. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कमीत कमी दोनशे रुपये दरमहा ११ महिने भरण्याचा पर्याय यात होता. त्यानंतर १२ वा हप्ता आडगाव सराफ भरेल आणि १२ महिन्यांच्या एकूण रकमेवर सोने खरेदी करता येईल, असे या योजनेचे स्वरुप होते. ग्राहकांकडील योजना पुस्तकावर तसे नियम आहेत.

आडगाव सराफने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना आकर्षित करत योजनेत सहभागी करुन घेतले. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील हजारो ग्राहकांनी योजनेत सहभाग घेतला. त्यातील अनेकांनी दरमहा एक हजारापासून ते १० हजारांपर्यंत रक्कम भरण्यास सुरुवात केली. ११ महिने रक्कम भरल्यानंतर गुंतवणुकदारांनी परताव्याबाबत विचारणा केली असता त्यांना १२ व्या महिन्याचा हप्ता कंपनीने भरल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १३ व्या महिन्यात केव्हाही येऊन जमा झालेल्या रकमेतून सोने खरेदी करा, असे सांगण्यात आले. त्यानुसार ग्राहकांनी १३ व्या महिन्यात विचारणा केली असता त्यांना योजना पुढे अशीच सुरू ठेवा, दोन वर्षांच्या एकूण रकमेतून अधिक सोने खरेदी करता येईल, असे सांगत दिशाभूल करण्यात आली. त्यानंतरही अनेक ग्राहक दोन ते पाच वर्षे योजनेच्या नियमानुसार पैसे भरत राहिले.


त्यानंतर शंका आल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदीबाबत विचारणा केली असता प्रत्येकीवेळी त्यांना पुढील महिन्याची तारीख देत चालढकल सुरू होती. अनेकांना गुंतवणूक केलेले पैसे परत देण्यासाठी आडगाव सराफाने १५ फेब्रुवारीची अंतिम तारीख दिली. त्यानुसार गुंतवणूकदार मोठ्या संख्येने कॅनडा कॉर्नर येथील आडगाव सराफ दालनात आले. मात्र, सर्व रक्कम न देता सुरुवातीला ठराविकच रक्कम दिली जात असल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले. त्यातून गुंतवणुकदारांना संशय आला. सर्वांनी एकाच वेळी पैसे मागण्यास सुरुवात केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. कॅनडा कॉर्नर परिसरात गुंतवणूकदार मोठ्या संख्येने आल्याने वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, शहर पोलीस, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी आले. त्यांनी गुंतवणूकदारांशी चर्चा करत गर्दीवर नियंत्रण आणले.

सहा महिन्यांपासून आश्वासन:
आडगाव सराफच्या सुवर्णसंधी योजनेत दरमहा एक हजार रुपये असे ११ महिने भरले. कंपनीने १२ वा महिना बोनस असे एकूण १२ हजार रुपये 26 जुलै २०१९ रोजी जमा झाल्याचे खात्यावर दाखवले. अनेकवेळा विचारणा करुनदेखील एक रुपयाही मिळालेला नाही. फक्त आश्वासन दिले जात आहे.