चांगली बातमी: आतापर्यंत 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले

नाशिक(प्रतिनिधी): नाशिकच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज पावेतो नाशिक महानगरपालिका कार्य क्षेत्रांमधील एकूण ४० रुग्ण बाधित होते. या व्यतिरिक्त परराज्यातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह होत्या. या पैकी परराज्यातील दोन्ही व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे. तसेच नाशिक शहरातील ४० रुग्णांपैकी १८ रुग्णांना आज पावेतो रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.

सदर रुग्ण नाशिक शहरातील नाशिक रोड, सातपूर कॉलनी, संजीव नगर, सावता नगर, मानेक्षा नगर, म्हसरूळ व जनरल वैद्य नगर येथील होते. अशाप्रकारे कोरोना बाधित होऊन सुद्धा सदर नागरिक उपचार करून सुखरूपपणे घरी पाठवण्यात आलेले आहेत.

आजपर्यंत 14 दिवसाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले तीन प्रतिबंधित क्षेत्र रद्द करण्याचे आदेश मा.आयुक्त राधाकृष्ण गमे  यांनी पारित केलेले आहे. सदर तीन क्षेत्र धोंगडे मळा नाशिकरोड, किशोर सूर्यवंशी मार्ग,म्हसरूळ व संजीव नगर, सातपूर हे आहेत.