100 कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी होणार !

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५/१अ पार्ट मधील क्षेत्र १५ हजार ६३० चौरस मीटरवरील आरक्षण क्रमांक २२० व २२१ हे क्षेत्र महापालिकेला विनामूल्य देण्यासाठी जागामालकाने राज्य सरकारला हमी देऊन नजराणा कमी करून घेतला मात्र प्रत्यक्षात टीडीआरद्वारे मोबदला घेतला आहे. या भूखंडला वेगळाच सर्वे नंबर देऊन झालेला सुमारे १०० कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी होणार असल्याचे आदेश नगर विकास मंत्रालयाने दिले आहे.

त्या संदर्भात नगर विकास मंत्रालयाचे नाशिक महानगरपालिकेला पत्र मिळाले आहे. नाशिक महानगरपालिकेत अनेक टीडीआर घोटाळे चर्चेत आले आहेत. पण त्यावर अजून पर्यंत चौकशी होऊन कारवाई झालेली नाही. मागील दोन तीन वर्षांपासून चर्चेत असलेला भूखंड घोटाळ्याकडे नगर विकास मंत्रालयाने लक्ष घातल्याने त्यावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्याबाबत एड. शिवाजी सहाणे यांनी तक्रार दाखल करून व उच्च न्यायालयात देखील धाव घेतली आहे. नंतर सुधाकर बडगुजर यांनी देखील हे प्रकरण स्थायी समितीत आणि महासभेत मांडले आहेत. या संदर्भात स्थायी समितीने चौकशी समिती तयार केली आहे. पण त्याचे कामकाज रखडले आहे. २५ हजार १०० प्रति चौरस मीटर दाखून जागा मालकास जादा रकमेचा टीडीआर देण्यात आला आहे. सुमारे ७५ कोटी रुपयांचा टीडीआर देऊन महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.