शहरात कोरोनासोबत आता डेंग्यूचीही लाट ; १०७ रुग्ण आढळले!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला चिकनगुन्या, डेंगू आणि व्हायरल ताप यासारखे रोग पसरत असून, आत्तापर्यंत डेंग्यूचे १०७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, सिडको, पंचवटी‌ व नाशिकरोड या भागात डेंगूच्या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे एकाला ताप आल्यास, कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याची त्वरित लागण होते. हातापायाला सूज येणे, ताप येणे, अंगदुखी ही डेंग्यूची लक्षणे आहेत. पावसाळा असल्यामुळे डासांच्या उत्पत्तीला मोठ्या प्रमाणावर हातभार लागत असून, साथीच्या आजारांना जणू आमंत्रणच मिळत आहे. असे वैद्यकीय विभागाकडून सांगितले जात आहे. काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तरी त्याठिकाणी डेंगू प्रतिबंधक फवारणी अजून झालेली नाही, महापालिका प्रशासनाकडून डेंगूबाबत पुरेशी जागृतीही होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

पालिका आरोग्य खात्याने घरातील पिण्याचे पाणी, टाक्या, शोभेची झाडे, छपरावरील प्लास्टिक टायर, रिकामे डबे, ए.सी.च्या पाण्यामुळे मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. असे सांगितले आहे. त्याचबरोबर कोठेही पाणी साचू देऊ नका अशा सूचनाही केल्या आहेत. सर्व बाजूंनी नागरिकांवर याबाबत खापर फोडण्यात येत आहे. तर महापालिकेकडून फक्त पाणी न साचू देण्याचा सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नवीन बांधकामाच्या तळघरात साचलेले पाणी,  परिसरात झालेली मोठी डबकी तसेच खड्डे न बुजवल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. मात्र, महापालिकेकडून यावर उपाययोजना न करता सरळ  नागरिकांना जबाबदार धरले जात असून, नागरिकांना सूचना देऊन महापालिकेने हात वर केले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790