महावितरणच्या पाठपुराव्याला यश; एनटीपीसीच्या प्रकल्पातून ५२५ मेगावॅट वीज उपलब्ध

NPA GOLD LOAN

राज्यात भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी उन्हाच्या तडाख्यात वीजग्राहकांना दिलासा

नाशिक (प्रतिनिधी): उन्हाच्या प्रकोपात कोळसा टंचाई व वाढलेल्या मागणीमुळे सुरु झालेले विजेचे भारनियमन संपुष्टात आणण्यासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.

शनिवारी (दि. १६) एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक प्रकल्पातून ५२५ मेगावॅट वीज मिळविण्यात महावितरणला यश मिळाले आहे.

दरम्यान, पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत असल्यामुळे मागणी व पुरवठा यातील तूट कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत असून उन्हाच्या तडाख्यातील वीजसंकटात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणकडून राज्यातील २ कोटी ८० लाख ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून वीज खरेदी केली जाते.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10468,10466,10464″]

तापलेल्या उन्हाळ्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात विजेची २४५०० ते २५००० मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून प्रामुख्याने कोळसा टंचाई तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २३०० ते २५०० मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली होती. परिणामी नाईलाजास्तव राज्यात भारनियमन करावे लागले. त्यातही देशात कोळसा व वीज टंचाईचे स्वरुप तीव्र असल्याने विजेच्या उपलब्धतेबाबत अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विजेची तूट भरून काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे व कोणत्याही परिस्थितीत राज्यात भारनियमन होणार नाही यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. विजेच्या तुटीची संभाव्य स्थिती पाहता महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी आपात्कालिन नियोजन केले व भारनियमन टाळण्यासाठी विजेची तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात वीज उपलब्ध करण्याचे अथक प्रयत्न सुरू केले.

या प्रयत्नांमुळे सद्यस्थितीत पुरेशी वीज उपलब्ध झाल्यामुळे दोन दिवसांपासून कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे व राज्यातील भारनियमन देखील टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले आहे. दरम्यान एनटीपीसीच्या सोलापूर औष्णिक प्रकल्पांतील विजेचे संच दि. ६ एप्रिलपासून तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने ५२५ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाला होता. महावितरणकडून एनटीपीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीजसंचाची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. परिणामी वीजसंचाची दुरुस्ती करण्यात आली व शनिवारी (दि. १६) दुपारपासून सोलापूर औष्णिक प्रकल्पातून ५२५ मेगावॅट वीज महावितरणसाठी उपलब्ध झाली आहे. महावितरणने केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात कोळसा टंचाईमुळे वीज संकट ओढवले असताना राज्यातील नागरिकांना भारनियमनातून मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates