गंगापूर धरणातून गुरुवारी ३००० क्युसेक्सचा विसर्ग ! पाणी कपात रद्द होणार का ?

गंगापूर धरणातून गुरुवारी ३००० क्युसेक्सचा विसर्ग ! पाणी कपात रद्द होणार का ?

नाशिक (प्रतिनिधी): गुरुवारी (दि. २९ जुलै रोजी) दुपारी चार वाजता गंगापूर धरणातून ३००० क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून पाणी कपात रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा बुधवारी ७९टक्क्यांवर तर दारणा धरणातील जलसाठा ७८ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे आठवड्यातून एक दिवस अर्थातच दर बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुढील आठवड्यात मागे घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे, मराठवाड्यासाठी धरणातून पाण्याचा अल्प प्रमाणामध्ये विसर्ग होत असताना नाशिककरांसाठी आठवड्यातून एक दिवस तरी पाणी कपात का असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात असून त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूह तसेच मुकणे धरणातील मंजूर पाणी आरक्षण संपुष्टात आल्यामुळे जुलै महिन्यामध्ये आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय झाला होता. हा निर्णय लागू झाल्यानंतर अंमलबजावणी सुरू होत नाही तोच धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यानंतरही आयुक्त कैलास जाधव यांनी ५० टक्क्यांऐवजी किमान धरणसमूहात ७५ टक्के पाणीसाठा होईपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणी कपात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

तिकडे मराठवाड्यासाठी मुबलक पाणी सोडले जात असताना नाशिककरांवर मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीची वेळ का? असा प्रश्न आता सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित होत आहे. पावसाळ्याचा अद्याप दोन महिन्यांचा कालावधी बाकी असल्यामुळे पाणी कपातीबाबत फेरविचार करण्याची सूचना भाजपकडून आल्यामुळे आयुक्त जाधव यांच्याकडून पुढील आठवड्यामध्ये फेरआढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात धरणांतील जलसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत फेरविचार केला जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790