५९ लाखांच्या मद्यासह १२ टायरचा ट्रक लांबविला

नाशिक (प्रतिनिधी): फायनान्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत महामार्गावर कार आडवी लावून सात जणांच्या टोळक्याने सुमारे ५९ लाख ४३ हजार ७१५ रुपये किमतीच्या विदेशी दारूसह १२ टायर ट्रक लांबविल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपासवर रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी ट्रकचा चालक आणि क्लीनरचे हातपाय बांधून त्यांना डोंगरावर सोडून पलायन केले.
मुळचा साक्री जिल्ह्यातील आणि हल्ली नाशिक येथे वास्तव्यास असलेला चालक लखन बुधा पवार (३०) आणि क्लिनर राजू पवार हे दोघे रामेश्वर आव्हाळे यांच्या मालकीची भारत बेंझ कंपनीची १२ टायरचा ट्रक (एमएच १८ एए ८८६७) ही शनिवारी (दि. १३) रात्री ९ वाजेच्या सुमारास दिंडोरी येथील युनायटेड स्पिरिट लिमिटेड कंपनीतून मॅकडॉवेल्स ब्रँडच्या मद्याचे ९५० बॉक्स भरुन निघाले. रात्री दोन वाजेच्या सुमारास ट्रकचा मालक रामेश्‍वर आव्हाळे यांच्या जेलरोड येथील घरी पोहचले. रविवारी (दि. १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास चालक लखन व क्लिनर राजू पवार ट्रक घेऊन चाकणला जाण्यासाठी निघाले. रात्री ११ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे बायपासवर हॉटेल सुमंगलजवळ पाठीमागून सफेद कारमधून आलेल्या सात अज्ञात चोरट्यांनी ट्रकला गाडी आडवी लावून ट्रक थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविल्यानंतर त्यातील एकाने चालक पवार यास काही कागदपत्र दाखवून तुमच्या गाडीचे तीन हप्ते थकलेले आहे. आम्ही फायनान्स कंपनीचे माणसे आहोत. तुमची गाडी आता आम्ही फायनान्स कंपनीचे गोडावूनला घेऊन जाणार आहे. त्यानंतर चालक पवार याने मालक रामा आव्हाळे यांना फोन करुन माहिती देत असताना दुसऱ्याने पवारच्या हातातून मोबाईल हिसकावून घेत आव्हाळे यांना बोलला की, आमचे पैसे बाकी आहे. आम्ही तुमची गाडी घेऊन गोडावूनला जातो. तुम्ही गोडावूनला या. असे बोलून त्याने फोन कट केला. एकाने ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेतला. बाकीच्यांनी चालक व क्लिनरला सफेद रंगाच्या कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर कानटोप्या घालून त्यांना भोजापूर खोऱ्याच्या दिशेने घेऊन गेले.
एका सुनसान ठिकाणी ट्रक थांबवत त्यांना खाली उतरवत डोंगरावर चालत घेऊन गेले. डोंगरावर दोघांचेही हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून त्यांच्याजवळील मोबाईल व पैसे काढून घेत निघून गेले. तेथील नागरिकांनी डोंगरावर जात राजूची सुटका केली. सोनेवाडी येथील माजी सरपंच कैलास सहाणे यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विकास काळे, हवालदार प्रकाश उंबरकर, प्रकाश गवळी, चव्हाणके यांनी तातडीने सोनेवाडी येथे जात चालक व क्लिनरला ताब्यात घेतले.