१ डिसेंबरपासून पुन्हा सुरु होणार जिल्हा न्यायालयाचे कामकाज !

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ९ महिन्यांपासून जिल्हा सत्र न्यायालयाचे अल्प वेळ कामकाज सुरु होते. मात्र, आता १ डिसेंबरपासून पुन्हा जिल्हा न्यायालयाचे कामकाज हे नियमित पूर्णवेळ चालणार आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २६ मार्च पासून दीड महिना राज्यभरातील सर्व न्यायालयांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, राज्य शासन उच्चं न्यायालयाच्या परवानगीने ऑनलाईन माध्यमातून नियमित ठराविक वेळेत कामकाज सुरु ठेवण्यात आले होते. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने न्यायालयाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. फक्त नियमित गंभीर गुन्ह्यांचे पोलिस कोठडी तारखांचे काम सुरु होते. परंतु, पुन्हा शासनाच्या नवीन परिपत्रकाअंतर्गत राज्यभरातील संपूर्ण जिल्हा न्यायालये व तालुकास्तरावरील न्यायालयांचे कामकाज १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

शासनाच्या उच्चं न्यायालयाच्या परिपत्रकानुसार, न्यायालयाचे कामकाज हे २ वेळांमध्ये सुरु होणार आहे. त्यानुसार, सकाळी ११ वाजेपासून ते १:३० वाजेपर्यंत आणि दुपारी अडीच ते साडेचार वाजेपर्यंत कामकाज सुरु होईल. यामध्ये सकाळच्या शिफ़्टमध्ये पुराव्यांचे व चौकशीचे कामकाज चालेल तर, दुपारच्या शिफ़्टमध्ये युक्तिवाद करता येईल. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावणे व सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे पक्षकारांना आवारात न्यायालयीन कामकाजाशिवाय प्रवेश मिळणार नाही.